परिचय

स्वामी विद्यानंद यांचा परिचय

परमपूज्य स्वामी विद्यानंद यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९२४ साली , कोजागिरी पौर्णिमेला विदर्भातील सावरखेड या गावी झाला.पूर्वाश्रमीचे नाव दामोदर केशव पांडे .त्यांना बालपणापासून अध्यात्माची गोडी होती. लहानपणीच अनेक आध्यात्मिक अनुभव आले व देवादिकांची दर्शने झाली . घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शालेय शिक्षणा नंतर लगेच नोकरी करावी लागली. जबलपूरला डिफेन्स अकाउंट्स ऑफिसमध्ये नोकरी लागली. १९५६ साली बदली पुण्याला झाली. नोकरी करीत असतानाच बहिस्थ विद्यार्थी म्हणून महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केले. पॉलिटिकल सायन्स व सोशीओलोजी या दोन विषयात M.A. केले.

अध्यात्मिक उन्नतीसाठी सत्पुरुषाच्या मार्गदर्शनाची त्यांना खूपच ओढ होती. त्यांना पावस, रत्नागिरी येथील परमहंस स्वामी स्वरूपानंद यांचा अनुग्रह लाभला व नाथ संप्रदायात त्यांचा प्रवेश झाला. आदीनाथ, मच्छिंद्रनाथ , गोरक्षनाथ, गहिनीनाथ , निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर यांनी प्रवाहीत केलेल्या सोSहम् साधनेत स्वामीजी तल्लीन झाले.

अनेक वर्षांच्या कठोर साधनेनंतर स्वामीजी आत्मस्थितीला पोहोचले. दरम्यानच्या काळात स्वामीजींनी महाराष्ट्रातील संत पंचक श्री ज्ञानेश्वर,तुकाराम,नामदेव,एकनाथ,रामदास- स्वामी तसेच श्री रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद , योगी श्री अरविंद, श्री माताजी, जे. कृष्णमूर्ती, भगवान रमण महर्षी इत्यादी महान विभूतींच्या चरित्राचा व त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास केला, चिंतन केले. आत्मानुभूती नंतर त्यांच्या ऋतंभरा प्रज्ञेतून त्यांना जे स्फूरण होत राहिले , त्यानुसार त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले.

त्यात मराठीबरोबर काही इंग्रजी ग्रंथही आहेत. काही गद्य स्वरूपात आहेत, तर काही पद्य स्वरूपात. ग्रंथातील भाषा इतकी साधी सरळ सोपी आहे की अगदी सर्वसामान्य वाचक देखील त्यात रमून जाईल व त्याला अध्यात्मासारखा विषय सहज रित्या आकलन होईल.
ह्या ग्रंथांपैकी प्रामुख्याने उल्लेख करावा असे गद्य ग्रंथ म्हणजे Paramhans of Pawas, मुक्तिबोध, स्वात्मबोध चिंतन (खंड १ ते ६ ) उपनिषद बोध (खंड १ ते ८ ), नारदीय भक्तीसूत्रे, अमृतानुभवातील अद्वैत दर्शन, ज्ञानदेवीतील सुवर्ण शलाका, चांगदेव पासष्टी,जगावेगळं जीवन पुष्प इत्यादी. पद्य ग्रंथांपैकी विशेष उल्लेख करावा असे म्हणजे भावार्थ भागवत, भावार्थ रामायण, स्वरूपस्पंद, सोSहम् हरीपाठ, शिवश्र्लोकी ,भावतरंग इत्यादी. अशी स्वामींची पन्नासहून अधिक ग्रंथांची संपदा आहे. 

श्री अरविंद व माताजी यांच्या तत्वज्ञानाकडे स्वामीजी फार पूर्वीपासून खेचले गेले होते . तसे त्यांनी स्वामी स्वरूपानंद यांना देखील सांगितले होते. त्यावर स्वामी स्वरूपानंद म्हणाले ‘जेथे श्रीअरविंद गेले तेथेच आपल्याला जायचे आहे.’ स्वामीजींनी सोऽहमसाधनेच्या आधारानेच पूर्णयोग व अतिमानसाच्या मार्गावर यशस्वी झवाटचाल केली. श्री अरविंद यांचे ‘सावित्री’ हे इंग्रजी महाकाव्य स्वामींनी ‘जगावेगळे जीवनपुष्प’ या कादंबरी स्वरूपात मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिले. या ग्रंथात नाट्य, कथा प्रसंग, ज्ञानमय विचारधार, भक्तीचे स्फुरण हे सर्व आले आहे आणि मूळ आशयाला कुठेच छेद जाऊ दिलेला नाही.

स्वामीजींचा संत वाङ्मयाचा मूळचाच गाढा व्यासंग, श्री सद्गुरूंचा लाभलेला वरदहस्त व सोSहम् प्रणित योगमार्गातील पूर्णत्वाप्रत पोहोचलेली यशस्वी साक्षात्कारी वाटचाल, या उज्वल आणि दिव्य पार्श्वभूमीवर त्यांची रंगणारी प्रवचने म्हणजे श्रोतृवृंदास एक अपूर्व मेजवानीच असे. कोणताही वेदप्रणीत सिद्धांत असो, पुराणांतर्गत कथाभाग असो, अगर भारतीय संत वाङ्मयातील ओवी, अभंग, दोहा, पदरचना असो.

अध्यात्म हा फक्त प्रवचनाचा विषय नसून प्रत्यक्ष जगण्याचा विषय आहे, ही त्यांची शुध्द धारणा होती. त्या धारणेला धरूनच केवळ ईश्वराला समर्पित असे जीवन जगण्यासाठी म्हणून त्यांनी ‘दिव्य जीवन वाटिकाश्रम’ या नावाने आश्रम स्थापन केला आणि स्वत: आश्रमाच्या जागेत १९९७पासून राहायला आले. 

पुण्याच्या आश्रमाची जागा अगदीच खडकाळ उंच सखल आणि गावाबाहेर होती. पाऊस कमी, जमीनीला पाणी नव्हते .अशाही जागेत स्वमीजींनी जे परीवर्तन घडवून आणले, तो तर एक चमत्कारच म्हणावा लागेल. अशा प्रकारे स्वतः केवळ ईश्वराला समर्पित असे जीवन जगून जणु त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून साधकांनी वाटचाल करावी हा त्यामागील एकमेव हेतू.

अशा प्रकारे आयुष्यभर प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून, स्वतःची तसेच आपल्या संपर्कात येणाऱ्या समाजातील इतर लोकांची भौतिक तसेच आध्यात्मिक स्वरुपाची उन्नती घडवून आणण्याचे महान कार्य निरपेक्ष भावनेने, जिव्हाळ्याने व सातत्याने आयुष्यभर करून दि.२५ सप्टेंबर २०२०, (पुरुषोत्तम)आश्विन मास, शुद्ध नवमी रोजी स्वामींनी वयाच्या ९६ व्या वर्षी महासमाधि घेतली.

Shopping Cart